नांदेड, दि. २१ एप्रिल:नांदेड जिल्हा प्रशासनाने आधारकार्डविषयीच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करत नागरिकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. आता नागरिकांना आपल्या आधारकार्ड संदर्भातील कोणतीही तक्रार थेट QR कोड स्कॅन करून नोंदवता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात येत असून सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तक्रार नोंदविणे झाले सोपे आणि पारदर्शक
आधारकार्डसंबंधी विविध प्रकारच्या तक्रारी – जसे की नावातील चूक, पत्ता किंवा मोबाईल क्रमांक अपडेट करणे, किंवा कार्ड डाऊनलोड न होणे – या तक्रारी अनेक नागरिकांना वारंवार भेडसावत असतात. मात्र, यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे, हे माहिती नसल्याने अनेक वेळा तक्रारच नोंदवली जात नाही. हीच अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने QR कोड स्कॅन करून तक्रार नोंदवण्याची सोपी आणि कार्यक्षम पद्धत सुरू केली आहे.
QR कोड स्कॅन केल्यानंतर एक ऑनलाइन तक्रार अर्ज उघडतो. त्यामध्ये नाव, ईमेल, संपर्क क्रमांक, आणि आधी तक्रार केल्यास त्याची माहिती भरून पाठवता येते. ही माहिती थेट जिल्हा आधार तक्रार कक्षाकडे पोहोचते. स्थानिक पातळीवर तक्रारीचे निराकरण शक्य नसल्यास संबंधित अर्ज मुंबई येथील आधार प्रकल्पाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे वर्ग केला जातो.
या उपक्रमाचे फायदे:
नागरिकांना थेट तक्रार नोंदवण्याची सुविधा
जलद आणि पारदर्शक कार्यवाही
वेळ आणि पैशाची बचत
डिजिटल पद्धतीने तक्रार नोंदणीची सुविधा
या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करत तक्रारींचे समाधान वेगाने होणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “आधारकार्ड संदर्भातील कोणतीही तक्रार असल्यास QR कोड स्कॅन करून तात्काळ तक्रार नोंदवावी आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”