भोकर येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय रामभरोसे चालते 

दुपारी १ वाजताही कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या
———————————–

​भोकर /प्रतिनिधी/
येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार सध्या पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक ९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास या कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ६:१५ पर्यंत असतानाही, भोकर येथील भूमी अभिलेख कार्यालयात आज दुपारी १ वाजता वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कार्यालयाचे दरवाजे उघडे होते, दिवे आणि पंखे सुरू होते, मात्र उपअधीक्षकांसह एकही कर्मचारी आपल्या टेबलवर हजर नव्हता. आपल्या जमिनीच्या कामासाठी लांबून आलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तासनतास कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागली.

​नागरिकांची ससेहोलपट
——————————-
उन्हाचा कडाका वाढत असताना ग्रामीण भागातून आलेले नागरिक कामानिमित्त कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र, कार्यालयात कर्मचारीच नसल्याने दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. “दुपारी एक वाजता जर कर्मचारी नसतील, तर सर्वसामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित नागरिकांनी केला.

​शिस्त कधी लागणार?
—————————-
शासकीय कर्मचाऱ्यांच्या लेट लतिफीमुळे आणि गैरहजेरीमुळे महत्त्वाचे दाखले, मोजणी आणि जमिनीचे उतारे मिळण्यास विलंब होत आहे. वरिष्ठ प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​चौकट:
​महत्त्वाची कागदपत्रे उघड्यावर?
————————
कर्मचारी उपस्थित नसल्याने कार्यालयातील महत्त्वाचे अभिलेख आणि कागदपत्रे सुरक्षित आहेत का, असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला आहे. रिकाम्या खुर्च्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.