अल्पवयीन मुलाच्या हाती कार देणे बेतले जीवावर; बुलढाण्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा भीषण अपघातात मृत्यू

बुलढाणा: अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनांचे स्टिअरिंग देणे किती घातक ठरू शकते, याची प्रचिती देणारी एक हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली आहे. मित्र परिवारासह कारने फिरण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. रितेश समाधान लहाने (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या अपघातात त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चिखली-खामगाव मार्गावरील शेलूद ते शिंदी हराळी फाटा दरम्यान घडली. रितेश हा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी होता. शिकवणी (Tuition) संपल्यानंतर रितेशने आपल्या मित्रांच्या भेटीसाठी किंवा फिरण्यासाठी कार (क्रमांक: GJ 05 C 94796) घेतली होती. कारमध्ये रितेशसोबत त्याचे मित्र काळे, महाडिक आणि उमाळकर हे देखील होते.

हे चौघेही शेलूद येथील शिक्षक कॉलनीतून शिंदी हराळी फाट्याकडे गेले होते. मात्र, परतीच्या प्रवासात असताना रितेशचा कारवरील ताबा सुटला. भरधाव वेगात असलेली ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली आणि एक-दोन वेळा पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, रितेशचा जागीच मृत्यू झाला.

आई-वडिलांचा एकुलता एक आधार हरपला रितेश हा लहाने कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने लहाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शवविच्छेदनानंतर त्याच्या मूळ गावी काटोडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिघांची प्रकृती गंभीर या अपघातात कारमधील रितेशचे तीन मित्र (काळे, महाडिक आणि उमाळकर) गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

पालकांसाठी धोक्याची घंटा पुण्यातील ‘पोर्श’ कार अपघाताची घटना ताजी असतानाच बुलढाण्यातील या घटनेने पुन्हा एकदा पालकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. अल्पवयीन मुलांकडे हट्टपायी किंवा लाडापोटी वाहने देण्यापूर्वी पालकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.