छत्रपती संभाजीनगर: पहिल्या पतीच्या अपघाती निधनानंतर मिळालेली विम्याची रक्कमच एका विवाहितेच्या आयुष्यासाठी काळ ठरली आहे. विम्याच्या ८० लाख रुपयांसाठी सासरच्यांनी केलेल्या अमानुष छळाला कंटाळून सहा महिन्यांच्या गरोदर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पल्लवी गोपाल सहाने (वय ३०, रा. स्वस्तिक सिटी, वडगाव कोल्हाटी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी हिचा पहिला विवाह २०१५ मध्ये झाला होता. मात्र, २०२१ मध्ये तिच्या पहिल्या पतीचे अपघाती निधन झाले. त्यानंतर ती आपल्या ६ वर्षांच्या मुलीसह माहेरी राहत होती. दरम्यान, १२ जुलै २०२४ रोजी तिचा दुसरा विवाह वडगाव कोल्हाटी येथील गोपाल सहाने याच्याशी लावून देण्यात आला. लग्नात माहेरच्यांनी ३ लाख रुपये रोख आणि ५ ग्रॅम सोन्याची अंगठी हुंडा म्हणून दिली होती.सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत चालला. मात्र, सप्टेंबर २०२४ मध्ये पल्लवीला पहिल्या पतीच्या विम्याचे ८० लाख रुपये मिळाल्याची माहिती तिचा दुसरा पती गोपाल आणि सासरच्या मंडळींना समजली. तेव्हापासूनच त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला आणि पैशांसाठी पल्लवीचा छळ सुरू झाला.३५ लाखांवर डल्ला आणि वाहनांची खरेदी विम्याचे पैसे जमा होताच पती गोपालने पल्लवीच्या खात्यातून पैशांची उधळपट्टी सुरू केली. त्याने ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनासाठी पल्लवीकडून तब्बल ११ लाख रुपये उकळले. इतकेच नाही तर घराच्या कारणास्तव आणि इतर मागण्यांसाठी त्याने पल्लवीच्या बँक खात्यातून आतापर्यंत ३० ते ३५ लाख रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.नणंदा आणि नातेवाईकांचाही छळ केवळ पतीनेच नाही, तर पल्लवीच्या नणंदा आणि इतर नातेवाईकांनीही पैशांसाठी तगादा लावला होता.नणंद सीमाच्या लग्नासाठी सासरच्यांनी २० लाख रुपयांची मागणी केली आणि छळ करून १० लाख रुपये देण्यास भाग पाडले.दुसरी नणंद अर्चना जाधव आणि तिचे पती किशोर जाधव यांनी स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी २० लाख रुपयांची मागणी करत दबाव टाकला होता.६ वर्षांच्या मुलीने सांगितली आपबिती पल्लवी सहा महिन्यांची गरोदर असतानाही तिला पैशांसाठी बेदम मारहाण केली जात असे. घरात होणाऱ्या या अत्याचाराची माहिती पल्लवीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या ६ वर्षांच्या मुलीने (इंद्रायणी) आपल्या आजीला दिली होती. १२ जानेवारी रोजी पल्लवीला पुन्हा मारहाण करण्यात आली. सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पल्लवीने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.पाच जणांवर गुन्हा दाखल या प्रकरणी पल्लवीची आई गोदावरी परमेश्वर घोपटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती गोपाल सहाने, नणंद कविता चिकटे, अर्चना जाधव, नणंदोई किशोर जाधव आणि दीर समाधान चिकटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.