‘संडे स्पेशल’ मटण पार्टीत मित्रावर गोळीबार; चांदा गावात तरुणाची हत्या, परिसरात खळबळ
अहिल्यानगर (अहमदनगर): जिल्ह्याच्या नामांतरानंतर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून, रविवारी (दि. ११) नेवासा तालुक्यातील चांदा येथे एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. ‘संडे स्पेशल’ निमित्त आयोजित कंदुरीच्या कार्यक्रमात जेवण सुरू असताना किरकोळ वादातून मित्रानेच मित्रावर गोळीबार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नेवासा तालुक्यातील चांदा-शनिशिंगणापूर रस्त्यावरील शेख वस्ती येथे घडली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने एका ठिकाणी कंदुरीचा (मटण जेवणावळ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शाहिद राजमोहम्मद शेख (वय २२, रा. चांदा) हा आपल्या काही मित्रांसोबत जेवणासाठी गेला होता.
जेवण सुरू असतानाच शाहिद आणि त्याच्या मित्रांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. सुरुवातीला चेष्टामस्करीतून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रागाच्या भरात सोबत असलेल्या एका मित्राने अचानक आपल्याकडील गावठी कट्टा (पिस्तूल) काढून शाहिदवर थेट गोळी झाडली. या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांची धाव आणि तपास गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेनंतर आरोपी आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
मृत शाहिदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट? मृत शाहिद शेख हा चांदा बसस्थानक परिसरात शेळी-बकरी विक्रीचा व्यवसाय करत होता. एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाची अशा प्रकारे हत्या झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागात गावठी कट्टे (अवैध शस्त्रे) किती सहज उपलब्ध होत आहेत, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या अवैध शस्त्रांचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
