स्वच्छता हीच सेवा’ : भोकरमध्ये भीम जयंतीचा विधायक उपक्रम
जयंतीनिमित्त बुद्ध विहार परिसरात स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी व भव्य मिरवणूक
———————
भोकर / प्रतिनिधी / भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून भोकर शहरात विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविण्यात आले. ‘स्वच्छता हीच सेवा’ हा मंत्र जपत राबविलेली स्वच्छता मोहीम, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि शांततामय वातावरणात निघालेली मिरवणूक यामुळे यंदाचा जयंती उत्सव शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
दिनांक १३ एप्रिल रोजी शहरातील पंचशील नगर येथील तक्षशिला बुद्ध विहार व परिसरात नगर परिषद, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह आणि पंचशील नगर भीम जयंती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, केवळ परिसर स्वच्छ करून न थांबता शहराला चकाकी देणाऱ्या ‘स्वच्छता दूतांच्या’ (कर्मचाऱ्यांच्या) आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. यावेळी उपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याकामी मोलाचे सहकार्य करणाऱ्या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता केंद्रे यांचा नगर परिषद व भीम जयंती मंडळाच्या वतीने भारतीय संविधानाची ‘उद्देशिका’ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
ध्वजारोहण आणि संविधान उद्देशिका वाचन
——————–
१४ एप्रिल रोजी जयंतीच्या मुख्य दिवशी सकाळी तक्षशिला बुद्ध विहार येथे प्रभाग नगरसेविका आरतीताई गणेश यशवंतकर, योगेश भोकरकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व अनुयायांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
या प्रसंगी दोन्ही नगरसेवकांच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तथा पंचशील नगर भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ जाधव यांच्यासह उपस्थीत सर्वांना भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
भव्य आणि शांततामय मिरवणूक
—————————–
मिरवणुकीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि अतिशय उत्साहपूर्ण पण शांततामय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गावरून जात या मिरवणुकीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या सर्व कार्यक्रमांना पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, नगरसेवक योगेश भोकरकर, नगरसेवक गणेश यशवंतकर, नगरसेवक दिलीप वाघमारे, नगरसेविका आरतीताई यशवंतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गृहपाल सुमित्रा साळुंखे, पत्रकार सिद्धार्थ जाधव, संभाजी कदम, पुंडलिकराव जाधव, नंदकुमार जापकर, सुभाष जाधव, सुभाष भालेराव, गजानन बरकमकर, माधुरी शिंदे, विश्वजीत जाधव, बालाजी चीलमवाड, सोणेकर, धम्मदीप डोणेराव, आशिष कदम, सुधीर वाघमारे, संदीप जाधव, मिलिंद जापकर यांच्यासह परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामाजिक संदेश
—————–
केवळ मिरवणुकांवर खर्च न करता आरोग्य, स्वच्छता आणि संविधान साक्षरतेचा सामाजिक संदेश देणाऱ्या या विधायक उपक्रमाचे भोकर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
